दापोली:- तालुक्यातील वाकवली नवानगर-गिरणगाव येथील एका साडेचार वर्षीय बालकाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सिरजल कमल भुजल असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची फिर्याद बाळाचे वडील गणेश भुजल (35, वाकवली, नवानगर- गिरणगाव, मूळगाव नेपाळ काशी) यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गणेश भूजल हे सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. 8 वाजता त्यांच्या पत्नीने दूरध्वनी करून आपला मुलगा सिरजल नदीच्या पाण्यात पडल्याची माहिती दिली. यानंतर कमल लगेच घरी गेले असता त्याच्या पत्नीने मुलाला एका खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र सिरजली प्रकृती अधिकच खालावल्याने डॉक्टरांनी आपल्या गाडीतून सिरजलला दापोली उपजिल्हा रूग्णालयात नेले.
कमल यांच्या पत्नीने मुलगा सिरजल यास कचरा टाकण्याकरिता पाठवले होते. तो बराच वेळ आला नाही म्हणून पत्नीने आरडाओरडा केला असता गावातील माजी पोलीस पाटील गणपत आंबेकर, मनोज कोळेकर यांची पत्नी व अनिता मोहिते यांनी शोधाशोध सुरू केली. ही शोधाशोध सुरू असताना मुलगा घराजवळील नदीच्या पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून खासगी दवाखान्यात नेले व नंतर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून 9:30 वाजण्याच्या सुमारास सिरजल मृत झाल्याचे घोषित केले. दापोली पोलीस स्थानकात अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुकाळे करीत आहेत.