गुहागर:-गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील गोविंदा मोबाईल शॉपीमधील 27 लाखाच्या बंपर चोरीमधील दुसऱ्या चोरट्याला गुहागर पोलिसांनी भिवंडी पोलीस स्थानकातून गुहागरमध्ये आणून गजाआड केले आहे. प्राथमिक तपासामध्ये त्याने या बंपर चोरीचीही कबुली दिल्याचे समजते.
इस्माईल नसरुद्दीन शेख (28, मुर्गी टोला, राजमहल जिल्हा साहेब गंज, झारखंड) असे गुहागरमध्ये आणलेल्या दुसऱ्या चोरट्याने नाव आहे. या अगोदर झारखंडमधून एका चोरट्याला अटक करण्यात आली होती. तालुक्यातील शृगारतळीमधील गोविंदा मोबाईल शॉपीमधील 27 लाखाचे मोबाईल व 90 हजाराची रोकड लांबवल्यानंतर गुहागर पोलिसांसमोर आव्हान होते. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजबरोबर चिपळुण बाजारपेठेतील विविध चोऱ्या तसेच हार्डवेअरमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये साहित्य घेतानाचे फुटेज मिळून आले होते. त्यानंतर एसटी बस स्थानक, रेल्वेस्टेशन आदी भागातही त्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याने सदर चोरटे झारखंडमधील असल्याचे समोर आले होते. त्याप्रमाणे गुहागर पोलिसांनी झारखंड येथे पोहचून एकाला ताब्यात घेतले होते त्यानंतरचा तपास पूर्णत थंडावला होता. मात्र भिवंडी येथे अन्य चोरीच्या गुह्यांमध्ये अटकेत असलेला इस्माईल शेख याचा शृंगारतळी येथील मोबाईल चोरीमध्ये सहभाग असल्याचे समोर आले होते. त्याप्रमाणे गुहागर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सुजित सोनवणे यांनी मंगळवारी आरोपीला आपल्या ताब्यात घेऊन गुहागरमध्ये अधिक तपासासाठी आणले. अजून दोन चोरटे फरार आहेत. या दुसऱ्या चोरट्यामार्फत दोन मुख्य चोरांचा तपास लागतो का? याकडे लक्ष लागले आहे.