सिंधुरत्न योजनेतून दिलेल्या टुरीस्ट बस लोकार्पण सोहळ्यात डावलल्याने संतप्त
लांजा : सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी प्रभाग संघांना देण्यात येणाऱ्या टुरीस्ट बस लोकार्पण सोहळा 15 ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथे पार पडला. दरम्यान या लोकार्पण सोहळ्याला सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांना या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रणच नसल्याची बाब पुढे आली असून यशवंतराव यांना जाणून बुजून डावलले जात असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत अजित यशवंतराव यांच्याशी संपर्क साधला असता, यशवंतराव म्हणाले रत्नागिरी येथे झालेल्या लोकार्पण सोहळ्याचे त्यांना निमंत्रण आलेले नाही तसेच कोणतेही कल्पना देण्यात आलेली नाही. महायुतीचा घटक पक्ष म्हणून त्यांची अजित पवार यांच्या माध्यमातून सिंधूरत्न समृद्ध योजनेच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे. तसेच महायुतीच्या घटक पक्षातील सदस्य असून देखील मला वारंवार डावलण्याचा प्रकार होत आहे.
या संदर्भात मी वरिष्ठांशी चर्चा करणार केली असून लोकार्पण सोहळ्याला प्रमोद जठार यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आले होते परंतु मला निमंत्रण देण्यात आलेले नाही. मी राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघात इच्छुक असल्यानेच मला सतत डावलण्याचा प्रकार पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीची धुरा सांभाळण्याचा कांगावा पालकमंत्री करत असल्याचा रोखठोक आरोप यावेळी अजित यशवंतराव यांनी केला.
राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी योजना राबविताना घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये स्वतःच्या पक्षाचाच प्रचार पालकमंत्री करत असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. महायुतीतील घटक पक्षांना विश्वासात न घेता घटक पक्षांचा विसर पडल्यासारखा स्वतःच्या मर्जीनुसार पालकमंत्री कार्यक्रम रेटवत असल्याचे चित्र रत्नागिरी जिल्ह्यात वारंवार दिसत आहे असे देखील अजित यशवंतराव यांनी सांगितले.