चिपळूणमध्ये शिवशाही अवतरणार!
चिपळूण प्रतिनिधी : शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र शेजारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून या पुतळ्याचे व चिपळूणच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नारायण तलावाचे लोकार्पण रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली.
चिपळूणमध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व्हावा, अशी मागणी लोकप्रतिनिधीसह जनतेची होती. अखेर चिपळूणवासीयांचे स्वप्न साकार होणार आहे. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा छत्रपती शिवरायांचा पुतळा चिपळूणमध्ये दाखल झाला. हा पुतळा बसविण्यात देखील आला आहे. तर चिपळूण शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या नारायण तलावाच्या सुशोभीकरणाचे काम देखील पूर्णत्वाकडे असून या कामाचे देखील रविवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी लोकार्पण होईल. तत्पूर्वी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सायंकाळी ४ वाजता शिव व्याख्यान, सायंकाळी ६ वाजता पोवाडा आणि ७ वाजता शिवपुतळ्याचे लोकार्पण होईल. या दोन्ही कार्यक्रमाला माजी पालकमंत्री व विद्यमान खासदार रवींद्र वायकर, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, माजी खा. विनायक राऊत, आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, आ. राजन साळवी, आ. योगेश कदम, माजी आ. रमेश कदम, माजी आ. सुभाष बने, माजी आ. डॉ. विनय नातू, माजी आ. बाळ माने, माजी आ. सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्यासह माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्ग मेहनत घेत आहेत.