रत्नागिरी:-सार्वजनिक ठिकाणी दारु पिणा-या चौघा संशयितांवर शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी शहर व ग्रामीण पोलिसांकडून नाणीज, प्रमोद महाजन क्रीडा संकुल, चंपक मैदान, मारुती मंदिर येथे ही कारवाई करण्यात आली. संशयितांच्या ताब्यातून पोलिसांनी दारुच्या बाटल्या हस्तगत केल्याचे सांगण्यात आले.
प्रकाश शिवराम शिवगण (रा.नाणीज रत्नागिरी), सनातन विलास शेरे (रा. सुभाष रोड, रत्नागिरी), उमेश चंद्रकांत देवरुखकर (रा.शिवाजीनगर रत्नागिरी) व संदीप गोविंद शिवगण (रा.धनजीनाका, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश शिवगण हा 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजता नाणीज शिवगणवाडी येथील काजूच्या बागेत दारु पित असल्याचे पोलिसांना आढळले होते, तर सनातन शेरे हा 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे दारू पिताना आढळला. उमेश देवरुखकर हा चंपक मैदान येथे तर संदीप शिवगण हा मारुती मंदिर येथील बियर शॉपशेजारी दारु पिण्यासाठी बसलेला असल्याचे पोलिसांना आढळले, त्यानुसार पोलिसांनी चौघांविरुद्धही महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 नुसार गुन्हा दाखल केला.