शेअर मार्केट गुंतवणुकीचे आमिष दाखवून 17 जणांची केली फसवणूक
दापोली:-दापोली तालुक्यातील सुमारे 17 जणांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो असे सांगूने पाच कोटी 99 लाखाचा गंडा घालणारा हर्ष अजय काताळकर (28,जालगाव, दापोली) याला दापोली पोलिसांनी कर्नाटक मधील बेंगलोर येथून अटक केली आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष कातळकर याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो असे सांगून दापोली परिसरातील लोकांचा विश्वास संपादन केला. यातून त्याने सुमारे 17 जणांकडून वेळोवेळी पैसे घेतले. तुमचे पैसे बुडणार नाहीत तुम्हाला मोठा फायदा होईल असे सांगून त्यांच्या खात्यातून रक्कम वेळोवेळी आपल्या बँक खात्यात जमा केली. त्यानंतर तक्रारदारांना दिलेले पैसेही परत दिले नाहीत किंवा घेतलेले शेअर्स प्रमाणपत्र देखील दिलेले नाही. म्हणून सुमारे 17 जणांनी सुमारे 5 कोटी 99 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची खात्री झाली.
हा प्रकार 30 एप्रिल 2022 ते 28 जून 2023 या कालावधीमध्ये घडलेला असल्याचे दापोली पोलीस स्थानकात तक्रार दिलेल्या मनीषा मालगुंडकर (60) यांनी नमूद केले आहे. या प्रकरणात एकूण 17 जणांनी आपली फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून हर्ष काताळकर हा 15 सप्टेंबर 2023 पासून फरार झाला होता. दापोली पोलीस गेले 11 महिन्यांपासून त्याच्या शोधात होते . रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या आदेशाने तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगाधर यांनी कातळकर याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय बातमीदाराच्या माध्यमातून माहिती घेतली.
त्यानुसार कातळकर बेंगलोर राज्य कर्नाटक येथे असल्याचे निश्चित झाले. यानंतर पोलीस गंगाधर बंगलोर येथे एक पथक घेऊन दाखल झाले. कर्नाटर-बंगलोर येथे सदर पथक सुमारे तीन दिवस तळ ठोकून होते. गंगाधर यांनी आरोपीचे मोबाईल तांत्रिक विश्लेषण वरून आरोपी बंगलोर येथे राहत असलेल्या घराचा लाईट मीटर नंबर प्राप्त केला होता. तसेच तो वापरत असलेल्या मोबाईल नेट कनेक्शनची माहिती देखील प्राप्त झाली होती. बेंगलोर येथील पथका मार्फत आरोपी कातळकर याला ताब्यात घेण्यात यश आले.
कातळकर याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाकडून 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी कातळकर याच्या खात्यावर तक्रारदार यांचे मार्फत पैसे वर्ग झाल्याचे पुरावे प्राप्त असून आणखी फसवणूक केलेली आहे का? यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास दापोली पोलीस उपनिरीक्षक गंगाधर करीत आहेत.