खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील श्री काळकाई देवी मंदिराजवळील खवले मांजर तस्करीप्रकरणात वनविभागाच्या पथकाने आतापर्यंत चौघांच्या मुसक्या आवळल्या. या तस्करीप्रकरणात आणखी एकाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. या संशयिताच्या मुसक्या आवळण्यासाठी दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील व पथकाने कंबर कसली. दत्ताराम शामा कोंडके याला महाड येथील राहत्या घरातून वनविभागाच्या पथकाने गजाआड केले. या प्रकरणातील संशयितांची संख्या 5 वर पोहोचली आहे.
5 महिन्यापूर्वी वनविभागाच्या पथकाने खवले मांजर तस्करीप्रकरणी आतिष अशोक सोनावणे (तुळशी बुद्रुक-बौद्धवाडी), अनिल धोंडूराम जाधव (नागाव-महाड), राजेंद्र रघुनाथ मोरे (दिवीळ-पोलादपूर) यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्याकडून खवले मांजरासह वाहतुकीसाठी वापरलेली वाहनेही हस्तगत केली होती. याप्रकरणात गेल्या 5 महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या दत्ताराम शामा कोंडके यालाही महाड येथील राहत्या घरातून वनविभागाच्या पथकाने गजाआड केले. या संशयितांची जामिनावर सुटका झाली. मात्र त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, खवले मांजर तस्करीप्रकरणात आणखी एकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.