चिपळूण : शहरात भररस्त्यात फिल्मी स्टाईलने मारहाण करणाऱ्या प्रहर जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्याला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील काविळतळी येथे मंगळवारी दुचाकीच्या किरकोळ अपघातानंतर भररस्त्यात एकाने दुसऱ्यास फिल्मी स्टाईने मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या मारहाण प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचा पदाधिकारी गणेश अनंत भोंदे (35, चिपळूण) याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद अस्ताफ हुसेन गोठे (34, गोवळकोट) यांनी दिली आहे.
अस्ताफ गोठे हे दुचाकीवरुन खाद्य पदार्थ आणण्यासाठी शहर बाजारपेठेकडून बहाद्दूरशेख नाक्याकडे जात होते. त्यावेळी काविळतळी येथे दोन दुचाकीचा किरकोळ अपघात झाला. काही किरकोळ वादानंतर यावर पडदा पडला होता, असे असताना घटनास्थळी असलेला प्रहार जनशक्ती पक्षाचा पदाधिकारी गणेश भोंदे याने अतिउत्साहात दुचाकीवर असलेल्या अस्ताफ गोठे यांना मारहाणीसह शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भररस्त्यात सुरु झालेल्या या प्रकारानंतर त्याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी उसळली. अर्ध्यातासाहून अधिक वेळ सुरु असलेल्या या मारहाण प्रकाराचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले. रात्री उशिरापर्यंत हा प्रकार पोलीस स्थानकात न आल्याने तो मिटला असावा असे असतानाच बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अस्ताफ यांना मारहाण करणाऱ्या भोंदे याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, तसेच ठोस कारवाई व्हावी, या मागणीसाठी मुस्लीम समाजाच्या पदाधिकाऱ्यानी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार राजमाने यांनी दिलेल्या सूचनेनुसार भोंदे याला पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल वृषाल शेटकर, संदीप मानके, पमोद कदम, कृष्णा दराडे आदींच्या पथकाने ताब्यात घेतले. तसेच अस्ताफ गोठे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भोंदे याच्यावर गुन्हा करण्यात आला आहे.