तातडीने कारवाईसाठी गाव कमिटीच्यावतीने पोलिसांना निवेदन
लांजा : लांजा शहरात मोठ्या प्रमाणात तरुण पिढी अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडत आहे. अनेक तरुण अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करत आहेत. याला आवर घालण्यासाठी प्रथमच गावातील ग्रामस्थ एकजुटीने उभे राहिले आहेत. त्यांनी एकत्र येत तरुण पिढीचे आयुष्य वाचण्याचा निर्णय घेतला आहे. संभाव्य गंभीर दुष्परिणाम लक्षात घेता अशा गोष्टींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लांजा गाव कमिटीच्यावतीने करण्यात आली.
याबाबतचे निवेदन लांजा तहसिलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना सादर करण्यात आले. दिवसेंदिवस विकसित होणारे लांजा शहराला अंमली पदार्थांचा विळखा पडला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची राजरोसपणे विक्री होत असून युवा पिढी देखील या अंमली पदार्थांचे सेवन करत आहे. किंबहुना ही तरुण पिढी या अमली पदार्थांच्या आहारी जात आहे. मात्र या गोष्टीला पायबंद घालण्यात लांजा पोलीस ठाण्यातून होत असलेले प्रयत्न हे कमी पडत असल्याचे दिसत आहे. अंमली पदार्थांची पाळेमुळे खणून काढून ही किड नष्ट करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केले आहे. मात्र अजूनही लांजा शहरात अशाप्रकारे अंमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असून तरुण पिढी त्याच्या आहारी जात आहे. परिणामी यामुळे पालक वर्ग पुरता हैराण झाला आहे. अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीची पाळेमुळे खणून काढून अशी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात पोलिसांच्या कारवाईमध्ये देखील सातत्य राहिलेले नाही. म्हणूनच अशा प्रकारचे वारंवार प्रकार लांजात घडत आहे. अंमली पदार्थांच्या विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अंमली पदार्थांची बीजे नष्ट करावीत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
सदर निवेदन सादर करताना गाव कमिटीचे प्रकाश लांजेकर, प्रसन्न शेट्ये, विठोबा लांजेकर, शौकत नाईक, गफार मुजावर, मारुती गुरव, प्रमोद कुरूप, राहुल शिंदे, अकबर नाईक, लवू कांबळे, राजेश लांजेकर, हेमंत शेट्ये, शेखर सावंत, गजानन गुरव, नागेश कुरूप, शरीफ नाईक, संजय लांजेकर, तुकाराम आग्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.