रत्नागिरी:-रत्नागिरी एसटी विभागातील अनेक फेऱ्या सोमवारी अचानक बंद झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल झाले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचेही हाल झाले. बऱ्याच उशिरापर्यंत गाड्या न आल्याने प्रवासी संतप्त झाले होते. एस. टी वर अवलंबून असलेल्या अनेकांना याचा फटका बसला. काहीजण मिळेल त्या वाहनाने किंवा खासगी वाहनाने रवाना झाले. मात्र याबाबत एस. टी विभागाशी संपर्क साधल्यानंतर लक्षात आले की, डिझेल संपल्याने एस. टी च्या फेऱ्या अचानक बंद करण्यात आल्या. यामुळे शहरातील रहाटाघर, शहर बसस्थानक याठिकाणी पवासी खोळंबल्याचे चित्र दिसून येत होत़े. कोणतीही पुर्वसूचना न देता एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.
सोमवारी दुपारपासून एसटीचे वेळापत्रक कोलमडल्याने नेमका काय प्रकार घडला हे प्रवाशांना समजून येत नव्हते. शहरातील शहर बसस्थानक येथे दुपारी शाळकरी मुले नेहमीप्रमाणे बसने घरी जाण्यासाठी थांबली होती, मात्र दोन तास उलटले तरी बस न सुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये चलबिचल सुरु झाली. यासंदर्भात काहींनी स्थानक प्रमुखांची चर्चा केली असता त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर एसटी विभागाकडून देण्यात आले नाह़ी. अखेर विद्यार्थ्यांनी मिळेल त्या खासगी वाहनाने आपले घर गाठले.
रत्नागिरी विभागाकडे 700 हून अधिक बस उपलब्ध आहेत सांगली येथून एसटी रत्नागिरी विभागाला डिझेलचा पुरवठा होत असतो नेमका कोणत्या कारणामुळे डिझेल पुरवठा झाला नाही, हे अद्याप समोर आलेले नाह़ी. सायंकाळी विद्यार्थी, कामावर आलेले नागरिक हे विविध बसस्थानकांवर अडकून पडल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अचानक उडालेल्या या गोंधळाने पुन्हा एकदा एसटीचा भोंगळ कारभाराचा प्रवाशांना फटका बसला.