दापोली:-नातेवाईकांसोबत येऊन बाहेरच्या व्यक्तीने घराची भिंत फोडल्याची तक्रार तालुक्यातील पंचनदी-निमुरडेवाडी येथील दिव्यांग संजय भाटकर यांनी महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आपल्याला कोणतीही पूर्व सूचना न देता बाहेरील व्यक्तीने आपल्या नातेवाईकासोबत आपल्या घरात घुसून आपले घर तोडायला सुरुवात केली. शिवाय त्यांनी आपल्यासह भांडणास सुरूवात केली. ‘आमचा जो रस्ता आहे तो तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता बंद केला’ असे म्हणून घराची बांधलेली नवीन भिंत तोडायला सुरुवात केली. आपण अपंग असल्यामुळे प्रतिकार करू शकलो नाही. नाईलाजाने आपल्याला पोलीस स्थानकाला दूरध्वनी करून कळवावे लागले.
घटनास्थळी पोलीस आल्यावर आपले घर तोडणे थांबवले. मात्र आपल्याला पोलीस स्थानक अथवा तहसील कार्यालयातून न्याय मिळालेला नाही. बाहेरच्या माणसाने आपल्या नातेवाईकांसोबत येऊन आपली भिंत पाडल्या प्रकरणी त्यांनी तंटामुक्त समितीकडे तक्रार दाखल केली आहे.
याबाबत बोलताना भाटकर म्हणाले, भर पावसामध्ये ही भिंत पाडलेली असल्यामुळे आपल्याला व आपल्या गरोदर मुलीला अतोनात त्रास होतोय. यामुळे लवकरात लवकर ही भिंत बांधून देऊन आपल्याला न्याय मिळावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.