श्रावणमासात धुतपापेश्वरला अभिषेक करण्याची भाविकांना संधी
राजापूर:-मार्च महिन्यामध्ये आगमन झालेल्या राजापूर उन्हाळे येथील गंगामाई अद्यापही प्रवाहीत असल्याने दि. 5 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या श्रावणमासामध्ये गंगास्नानाची पर्वणी व गंगाजलाने श्रीदेव धुतपापेश्वरला अभिषेक घालण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.
यापुर्वी गंगामाईचे झालेले आगमन सुमारे अडिच वर्षाने म्हणजे डिसेंबर 2023 दरम्यान निर्गमन झाले होते. गंगामाईचे पुन्हा एकदा अल्पावधितच म्हणजे तिन महिन्यात ऐन शिमगोत्सवामध्ये 24 मार्च 2024 मध्ये आगमन झाले. गेली चार महिने गंगामाईचे वास्तव्य असून अद्यपाही प्रवाहीत आहे. या कालावधीमध्ये लाखो भाविकांनी गंगास्नानाची पर्वणी साधली. श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. व्रतवैकल्यांच्या महिन्यामध्ये गंगामाईमध्ये स्नान करणे हे पवित्र मानले जात आहे. त्यामुळे यावर्षी हा योग आला असून भाविकांसाठी ती एक पर्वणीच ठरणार आहे.
तर दुसरीकडे भगवान शंकराच्या जटेतून गंगेमाई अवतरली अशी आख्यायिका आहे. तीच गंगामाई येथील भाविकांच्या श्रध्देतून उन्हाळे येथील डोंगर माथ्यावर अवतरली आहे. श्रीदेव शंकर व गंगामाईचे अनोखे असे नाते आहे. राजापूर धोपेश्वर येथील श्री धुतपापेश्वर देवस्थान हे शंकराचेच अवतार असल्याने श्रावण महिन्यात श्रीदेव धुतपापेश्वरला अभिषेक घालण्याला विशेष महत्व आहे. आणि यावर्षी ही पर्वणी साधण्याची सुवर्णसंधी भाविकांना या श्रावण महिन्यात मिळाणार आहे. आगमनापासून गंगामाई आजपर्यंत अखंडीतपणे प्रवाहित राहीलेली आहे.
सद्यस्थितीमध्ये मुळगंगेसह चंद्रकुंड, सुर्यकुंड, बाणकुंड,
यमुना कुंड, सरस्वती कुंड, गोदावरी कुंड, अग्नी कुंड, भीमा कुंड, चंद्रभागा कुंड अशी सर्व कुंड पाण्याने भरली आहेत. काशी कुंडातील पाणी गोमुखातून प्रवाहीतही राहीलेले आहे.