“दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अंगीकृत कलागुणांना ओळखा” – गटशिक्षणाधिकारी भोसले
जैतापूर : समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद रत्नागिरी, समावेशित शिक्षण विभाग राजापूर अंतर्गत सागवे येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आंबा कलम बांधणी कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
समावेशित शिक्षण विभाग राजापूर अंतर्गत सागवे हायस्कुल येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः गटशिक्षणाधिकारी श्री.उत्तम भोसले यांच्या हस्ते फित कापून कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
त्यांनतर विशेष शिक्षक श्री. नितेश देवळेकर यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेतून कोकणात आंबा कलम बांधणी प्रशिक्षण गरजेचे असल्याचे विषद केले. गटशिक्षणाधिकारी श्री. भोसले यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अंगीकृत कलागुणांना ओळखून त्यांचा अशा व्यवसायपूर्व कौशल्य उपक्रमातून विकास घडवून आणणे गरजेचे आहे त्यासाठी आमची समावेशित राजापूर ची संपूर्ण टीम चांगले कार्य करत असल्याचे नमूद करून त्यांचे विशेष कौतुक केले.
विशेषतज्ञ श्री.ज्ञानेश्वर गुरव यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसंबधी सविस्तर माहिती देताना आपल्या मनोगतातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अशा कौशल्याधिष्टीत उपक्रमांची गरज असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यशाळेस सुरुवात झाली. कार्यशाळेत प्रशिक्षक श्री.नवनाथ वासगे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या सहकार्याने समावेशित शिक्षण विभागातील विशेषतज्ञ, विशेष शिक्षक यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृतीतुन आंबा कलम बांधणी करून घेतली. सर्वांच्या मदतीने दिव्यांग विद्यार्थ्यांनी आंबा कलम बांधून दाखविले. उपस्थित मान्यवरांनी आंबा कलम बांधणीची कृती विचारल्यावर दिव्यांग विद्यार्थ्यांनी क्रमानुसार कृती सांगितली. त्यावर सर्वांनी या दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
आंबा बांधणीसाठी पावसाळ्यातील पोषक वातावरण ओळखून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी समावेशित शिक्षण विभाग राजापूर यांच्या संकल्पनेतून दिव्यांग विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून शाळेतील शिक्षक व विशेष शिक्षक यांच्या मदतीने दिव्यांग विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून त्यांना कोणत्या पद्धतीचे कौशल्ये विकसित करता येतील व ते कोणत्या पद्धतीने शिकविता येईल हे ठरवून विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृतीतून नवनवीन उपक्रम राबविले जातात.
आंबा कलम बांधणी हा कोकणातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारा व्यवसाय आहे, आणि त्यासाठी शालेय स्तरावरूनच असे व्यवसायपूर्व प्रशिक्षण राबविणे हे खरंच कौतुकास्पद आहे.
या कार्यशाळेस दिव्यांग मुलांकडून या कौशल्यावर प्रशालेचे सर्व शिक्षक, विशेष शिक्षक, विशेषतज्ञ यांनी घेतलेली मेहनत दिसून आली.
आंबा कलम बांधणी कार्यशाळा कार्यक्रमावेळी गटशिक्षणाधिकारी श्री.उत्तम भोसले, केंद्रप्रमुख श्री.शब्बीर शेख, संस्थेचे पदाधिकारी श्री.विलास कुलकर्णी, श्री.आशिष कुलकर्णी, श्री.चंद्रकांत देवरूखकर, श्री.महेश सकपाळ, श्री.प्रकाश गुरव, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. भारत कांबळे, सहाय्यक शिक्षक श्री.बलवंत मोहिते, तसेच समावेशित शिक्षण विभागाचे विशेषतज्ञ श्री. ज्ञानेश्वर गुरव, विशेष शिक्षक श्री. मुकेश मधाळे, श्रीम.रुबिना नावळेकर, श्री.नितेश देवळेकर हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बलवंत मोहिते तर आभार श्री. भारत कांबळे यांनी केले.