दापोली : तालुक्यातील कुडावळ बौद्धवाडी येथे रामजी बाबल्या पवार या 70 वर्षीय वृद्धाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद सखाराम पाचणेकर (40, रा. कुढावळे बौद्धवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामजी पवार हे 2 ऑगस्ट रोजी दुपारी 3 च्या सुमारास कुडावळ बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बैलांना घेऊन जात होते. यावेळी शरद सखाराम पाचणेकर (40, रा. कुढावळे बौद्धवाडी) हा पवार यांच्या घरासमोर दुचाकी उभी करून बसला होता. पवार यांनी बैलाला हाकलण्यासाठी काठी फेकून मारली असता ती काठी बैलाला न लागता पाचणेकर याच्या दुचाकीच्या आरशाला चुकून लागली व त्यात आरसा फुटला. पाचणेकर याला त्याचा राग आला. त्याने दुचाकीवरून उतरून रामजी पवारला शिवीगाळ करत त्यांनी फेकलेली काठी उचलून पवार यांच्या उजव्या हाताच्या दंडाला व उजव्या पायाच्या ढोपराला मारहाण केली. यावेळी रामजी पवार याने आरडाओरड केली तेव्हा त्याची भावजय विद्या पवार या तेथे आल्या. त्यांनी पाचणेकरला काय झाले, असे विचारले असता पाचणेकरने तिलाही मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये तिच्या उजव्या हाताला फटका बसला. तुम्हाला बघून घेतो, असे तिला पाचणेकर म्हणाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पवार यांनी शरद पाचणेकरला माझी लावलेली भातशेती तुझ्या गुरांनी खाल्ली होती, त्यावेळी आम्ही तुला काहीही बोललो नाही, असे म्हटल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत रामजी पवार (70, रा. बौद्धवाडी कुडावळ) यांना दुखापत झाली. दापोली पोलिसात शरद पाचणेकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 118 (1), 352, 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. दापोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.