पराग राणे आणि प्रसाद राणेच्या नावाने लांजात संभ्रमावस्था
रत्नागिरी:-राज्यभर बनावट नोटांच प्रकरण गाजत आहे. रत्नागिरीसारख्या छोट्याशा जिल्ह्यात अशा उद्योगाची पाळेमुळे रुजल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही पाळेमुळे खोदून काढताना पोलिसांनी जिल्ह्यातील जवळपास ६ ते सात जणांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेने यापूर्वी शहानवाज शिरलकर (५०), राजेंद्र खेतले (४३), संदीप निवलकर (४०), ऋषिकेश निवलकर (२६), प्रसाद राणे (रत्नागिरी), अमित कासार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकाराने जिल्ह्यात चर्चाच चर्चा रंगत आहे. रत्नागिरीतून प्रसाद राणे याला अटक केल्यानंतर आता लांजा येथे बनावट नोटा पोचवनाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. सद्या तालुक्यात दबक्या आवाजात याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान लांजा येथील किराणा मालाचा व्यापारी असलेल्या पराग राणे याला शनिवार १५ जून रोजी लांजातील सारस्वत बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीन मध्ये पाचशे रुपयांच्या ५१ नोटा अशा एकूण २५ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा स्वतःकडे बाळगून तसेच बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीन मध्ये भरून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात मंगळवार १८ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी राणे याला लांजा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर पुन्हा पोलिसांनी पराग राणे याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर जवळपास एक महिन्यांनी रत्नागिरीतील एम आय डी सी येथे प्रिंटिंग प्रेसवर धाड टाकून दुसऱ्या प्रसाद राणे याला अटक करण्यात आली होती. त्याला मुंबई पोलिसांनी रत्नागिरीतून उचलले होते. त्याला न्यायालयात हजर केले असता ५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र आता लांजा येथे वेगळीच चर्चा रंगली आहे. पूर्वी या प्रकरणात अटक केलेला लांजातील पराग राणे नाही ना? त्याच्याकडे संशयास्पद पाहिले जात होते, मात्र रत्नागिरीतून ताब्यात घेतलेला प्रसाद राणे आणि लांजा मध्ये असलेला पराग राणे यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र नावात साधर्म्य असल्यामुळे त्याच्याविषयी चर्चा रंगत होती. परंतु तो राणे परिसरात फिरताना दिसल्याने अनेकांचे गैरसमज दूर झाले. या दोन महिन्यात एवढ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. तर हे काम गेले किती महिने चालत असेल? शिवाय याची व्याप्तीही मोठी असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात आता कितीजण या नोटा पसरवण्याचे काम करत होते. लवकरच समोर येणार आहे.
मात्र लांजा येथे आता आणखी चर्चा आहे ती लांजात या नोटा आल्या कशा? आणि ज्याने या नोटा आणल्या आहेत आणि त्या बाजारात फिरत आहेत तो कोण? त्याचे मात्र धाबे दणाणले आहेत. आता पोलीस आपल्यापर्यंत पोचणार अशी त्याला कुणकुण लागली आहे. त्यामुळे लांजात उलट सुलट चर्चा होत आहेत. की आता हा नवीन उपद्रवी माणूस कोण? लवकरच त्याचा छडा लागणार आहे.