रत्नागिरी : मूळ राजापुरातील असलेल्या वकील सौरभ सोहोनी (३२, राजापूर) यांनी भाट्ये येथील पुलावरून उडी घेत २३ जुखे रोजी आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येने वकील वर्गासह रत्नागिरीत मोठी खळबळ उडाली होती. त्याने कोणत्या कारणाने आत्महत्या केली असावी असे तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र आता याचा उलगडा झाला असून नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
सोहनी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलवर स्टेटस ठेवला होता. या स्टेटसमध्ये त्यांनी ‘ माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे, माझी शेवटची इछा म्हणून… कृपया माझ्या मित्रांची, माझ्या नातेवाईकांची, माझ्या रूम मेटची, मी राहत असलेल्या मालकांची अथवा अन्य कोणाचीही चौकशी करू नये’ असे या स्टेटसवर म्हंटले होते. ही त्याची पोस्ट त्याच्या काही वकील मित्रांनी वाचल्यानंतर त्यांनी लगेचच रत्नागिरी शहर पोलिसांना फोन केला. तो भाड्याने रहात असलेल्या थिबा पॅलेस जाऊन पाहणी करण्यात आली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशी खडपेवठार येथे त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृत्यूचे कारण पोलीस शोधत होते. मात्र आता त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. केसेस मिळत नसल्याने सौरभ निराश होता. एवढे शिक्षण घेऊनही आणि केसेस मिळत नसल्याने उदर निर्वाहाचा प्रश्न उद्भवत होता. या नैराश्यातून सौरभ याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.