खेड / प्रतिनिधी:-लोटे औद्योगिक वसाहतीतील एक्सेल इंडस्ट्रीज कंपनीत झालेल्या वायूगळतीची घटना ताजी असताना श्री पुष्कर केमिकल्स ऍण्ड फर्टीलायझर्स कंपनीतही बुधवारी सायंकाळच्या सुमारास दुसऱ्यांदा झालेल्या वायूगळतीने एकच खळबळ उडाली. मात्र कंपनी प्रशासनाने वायूगळती नियंत्रणात आणल्याने कोणालाही त्रास झाला नसल्याचे समजते. एमआयडीसीत वायूगळतीचे सत्र सुरूच असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
श्री पुष्कर केमिकल्स ऍण्ड फर्टीलायझर्स कंपनीत यापूर्वीही वायूगळती झाली होती. यानंतर एक्सेल इंडस्ट्रीज कंपनीतही झालेल्या वायूगळतीने चौघांची प्रकृती बिघडली होती. या वायूगळतीनंतर लोटे- चाळकेवाडी व गुणदे-तलारीवाडी येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून कायमस्वरूपी अन्यत्र स्थलांतरासह पुनर्वसन करण्याचा आग्रह धरला आहे. याप्रश्नी ग्रामस्थांसमवेत बोलावलेली बैठकही बारगळली आहे.
यापाठोपाठ श्री पुष्कर केमिकल्स ऍण्ड फर्टीलायझर्स कंपनीत पुन्हा झालेल्या वायूगळतीने परिसरातील ग्रामस्थ भयभयीत झाले आहेत. कंपनी व्यवस्थापनाने अग्निशमक दलाच्या मदतीने वायूगळती आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. एका महिन्यात वायूगळतीची तिसरी घटना घडलेली असतानाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अजूनही सुस्तच असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. वायूगळतीमुळे मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.