पोलीस उपनिरीक्षकपदी निवड
लांजा:-तालुक्यातील बोरथडे गावचा सुपुत्र प्रतिक राणे हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ‘एम.पी.एस.सी.’ परीक्षा उत्तीर्ण झाला असून पोलीस उप निरीक्षकपदी त्याची निवड झाली आहे. जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी असली की, कोणत्याही परिस्थितीत यश खेचून आणता येते हे प्रतिक राणे याने दाखवून दिले आहे. लांजासारख्या ग्रामीण भागात कोणत्याही शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध नसताना स्पर्धा परीक्षेसारख्या कठीण परीक्षेत यश मिळविण्याचे आव्हान प्रतिक राणे याने पार केले आहे.
प्रतिक राणे याचे प्राथमिक शिक्षण बोरथडे गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण राजापूर तालुक्यातील वाटुळ येथील माध्यमिक शाळेत झाले. त्यानंतर त्याने आपले महाविद्यालयीन शिक्षण लांजा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून पूर्ण केले. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात त्याने केमिस्ट्री विभागातून बी.एस्सी. ही पदवी प्राप्त केली. पदवी प्राप्त केल्यानंतर त्याने विविध स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला प्रतिक शिक्षण घेत असताना शेतीच्या कामात देखील आपल्या आईवडिलांना मदत असे. प्रतिक याला राजापुर येथील संकेत गुरसाळे या मित्राचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. संकेत गुरसाळे हा सध्या मुंबई येथे मंत्रालयात सहायक पदावर कार्यरत आहे.
पुणे शहरामध्ये स्वअध्ययन करून प्रतिक राणे याने स्पर्धा परीक्षा देत यशाला गवसणी घातली आहे. प्रतिक हा लहानपणापासून शिक्षणात अत्यंत हुशार होता. त्यामुळे तो पुढे जावून नक्कीच कोणीतरी मोठा माणूस बनेल असा विश्वास त्याच्या आई-वडिलांना होता. आई-वडिलांचा हा विश्वास अखेर प्रतिक याने सार्थ ठरविला आहे. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला प्रतिक आज पोलीस उप निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. याचा त्याच्या कुटुंबियांनाच नव्हे तर संपूर्ण बोरथडे गावाला सार्थ अभिमान वाटत आहे.