राजापूर/तुषार पाचलकर:- “१ऑगस्ट या दिनाला अत्यंत महत्त्व असून हा दिवस भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे लढवये नेतृत्व व जहाल मतवादाचे पुरस्कर्ते लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेतृत्व व साहित्यसम्राट म्हणून ओळख असणाऱ्या अण्णाभाऊ साठेंची जयंती म्हणून ओळखला जातो.
लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ हे वृत्तपत्र सुरू करून सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू करून स्वातंत्र्य चळवळ सामूहिक करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यलढ्यात दिलेले त्यांचे योगदान अनमोल आहे. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यातील योगदान खूप मोठे आहे. भारतीय भाषांबरोबर पाश्चात्य भाषेतही त्यांच्या साहित्यकृती अनुवादित झाल्या यावरून त्यांच्या साहित्याची थोरवी समजते.
अशा या महान विचारवंत आणि महात्म्यांचे विचार आपण आत्मसात करूया,” असे आवाहन प्रा. एस. एस. धोंगडे यांनी केले. ते श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आयोजित ‘अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी’ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. ए. येल्लुरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बी. टी. दाभाडे, प्रा. पी.पी.राठोड, प्रा. एम. डी. देवरुखकर आदी मान्यवर होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ बी टी दाभाडे यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. ” लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला योग्य दिशा दिली. गीतारहस्य चे लेखन करून प्राचीन भारतीय संस्कृतीची जपणूक केली. अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवसाच्या शाळा शिकून प्रचंड मोठे साहित्य लेखन केले. अशा या दोन विभूतींचे विचार तरुणाईने आत्मसात करावेत, ” असे आवाहन आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.एम.ए.येल्लुरे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पी.पी.राठोड यांनी तर आभार प्रा.एम. डी.देवरुखकर यांनी मानले.