चिपळूण- काल झालेल्या हिंदुत्ववादी संघटनाच्या मोर्चामध्ये हिंदू समाजाबद्दल अश्लील बोलणाऱ्या महिलेविरोधात अखेर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आसमा हनिफ परकार असे या महिलेचे नाव आहे.
उरण येथे यशश्री शिंदे या युवतीची काही दिवसांपूर्वी क्रूर हत्या आणि तिच्या मृतदेहाची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. याच्या निषेधार्थ चिपळूण येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन चिपळूण शहरात आज मोठे आंदोलन केले. मात्र शहरातील स्व. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल येथे हे आंदोलन सुरू असताना अचानकपणे आसमा हनीफ परकार ही महिला तिथे आली आणि तिने हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्य केले. त्यानंतर तेथे उपस्थित आंदोलनकर्ते प्रचंड संतापले. या महिलेला आंदोलनकर्ते घेराव घालणार तत्पुर्वीच पोलिसांनी मोठ्या शिताफीने तिला ताब्यात घेतले.
यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी आसमा हिला तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी आंदोलन करणारेही लगेचच पोहोचले. यानंतर पोलीस ठाण्यातच जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दक्षता घेत होते. या महिलेवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी करत चिपळूण पोलीस स्थानकात हिंदुत्ववादी संघटनांनी ठिय्या केले. अखेर चिपळूण पोलिसांनी तक्रार दखल करून घेत आसमा परकार हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.