जागरूक नागरिक कमलेश देसाई यांनी आणले उघडकीस!
सावर्डे:-चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. लोकांच्या आरोग्याशी सबंधित वाईट बातमी समोर आली आहे. सावर्डे येथील एका रेशन दुकानात असलेल्या तांदळामध्ये उंदरांच्या लेंड्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. याशिवाय या धान्यामध्ये कचरा, दगडही आढळून आले आहेत. अशा प्रकारचे निकृष्ट धान्य गोरगरीब जनतेला वितरीत होत आसल्याने संताप व्यक्त होत आहे. सावर्डेतील या रेशन दुकानातील प्रकार जागरूक ग्रामस्थ कमलेश देसाई यांनी उघडकीस आणला आहे.
येथील रेशन दुकानात असलेला निकृष्ट प्रतीचा तांदूळ लोकांना वितरीत केला जात आहे. यामुळे गोरगरीब जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवल्यास याची प्रशासन जबाबदारी घेणार का? घडलेल्या प्रकारावर प्रशासन काय उत्तर देणार याच्या प्रतीक्षेत नागरिक असून सदर हलगर्जीपणा समोर आल्याने प्रशासन कारवाई करणार की पाठीशी घालणार असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. हे धान्य जिल्हा पुरवठा विभागाकडून येत असल्याने येथील धान्यच निकृष्ट दर्जाचे तर नाही ना असा प्रश्नही उपस्थित होत आहे. सावर्डेतील या निकृष्ट धान्याची छायाचित्र श्री. कमलेश देसाई यांनी टिपली असून त्यांनी ती सोशल मिडियावर देखील प्रसिद्ध केली आहेत. यातून जिल्हा पुरवठा प्रशासन व संबंधित अधिकारी व यंत्रणेने सकारात्मक बोध घेऊन पुढील कार्यवाही करावी अशी अपेक्षा श्री. कमलेश देसाई यांनी व्यक्त केली आहे.