जाकादेवी/ वार्ताहर-रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड- जाकादेवी येथील रहिवाशी तसेच मालगुंड शिक्षण संस्थेच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील व उत्साही माजी शिक्षिका श्रीम. उषा प्रभाकर राणे यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी रविवार दि.३१ जुलै रोजी दु.३ वा. मालगुंड येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
दिवंगत उषा प्रभाकर राणे यांनी तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयात अध्यापनाचे उत्कृष्ट काम केले.शाळा व शिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमांत त्यांचा उत्तम सहभाग असे. विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.भारत स्काऊट गाईड चळवळीतही त्यांनी आपले पती स्काऊटर कै.प्रभाकर दत्तात्रय राणे यांच्या साथीने त्यांनी त्यावेळी अतिशय उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी केली होती.रत्नागिरी जिल्हा भारत स्काऊट- गाईडच्या उपक्रमशीलतेबद्दल त्यांना दीर्घ सेवा पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना ,जावई ,नातवंडे ,भाऊ, दीर असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल जाकादेवी-मालगुंड परिसरातून दुःख व्यक्त होत आहे. कै. उषा प्रभाकर राणे यांना मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी, मालगुंड व काजुर्ली विद्यालयातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.