चिपळूणच्या पक्षी अभ्यासकांना यश, विणीच्या यशाचा दर ७९ टक्के,महत्वपूर्ण निरीक्षणेदेखील नोंद
मार्गताम्हाने/प्रशांत चव्हाण – चिपळुणातील पक्षी अभ्यासकांनी तब्बल २० वर्षे सामान्य खंड्या म्हणजेच ‘कॉमन किंगफिशर’ या पक्ष्याच्या घरट्यांचे निरीक्षण करून
त्याच्या विणीसंदर्भातील संशोधन निबंध प्रकाशित केला आहे. सामान्य खंड्याच्या विणीविषयीचा हा भारतामधील पहिलाच अभ्यास असून या माध्यमातून प्रथमच देशातील सामान्य खंड्याच्या विणीच्या यशाचा दर ७९ टक्के नोंदविण्यात आला आहे. सोबतच, या पक्ष्याचा प्रजनन हंगाम, अंड्यांची
संख्या, अंडी उबवण्याचा काळ यासंदर्भातील महत्वपूर्ण निरीक्षणेदेखील नोंदवण्यात आली आहेत.
महाराष्ट्रात सात प्रजातींचे खंडया पक्षी आढळतात. त्यांपैकी सामान्य खंड्या या पक्ष्याच्या अधिवासाचा विस्तार जगभरातील मोठ्या भूभागामध्ये आहे. या पक्ष्याच्या जगभरात सात उपप्रजाती आढळतात. त्यांपैकी तीन या
भारतात आढळतात, त्यांमधील गोदावरी नदीच्या दक्षिणेपासून खालच्या भूप्रदेशात आढळणाऱ्या उपप्रजातीला ‘A.a bengalensis’ म्हणून ओळखले जाते.
या उपप्रजातीच्या विणीचे सखोल संशोधन चिपळूणचे पक्षी अभ्यासक सचिन पालकर आणि प्रणव गोखले यांनी केले आहे. २००४ ते २०२३ या २० वर्षांच्या काळात २६ घरट्यांचे निरीक्षण करून त्यांनी हा संशोधन निबंध प्रकाशित केला आहे. ‘जर्नल ऑफ साऊथ एशियन ऑर्निथोलॉजी’ च्या इंडियन बर्ड 20 व्या अंकात हे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
चिपळूणचे पक्षी अभ्यासक सचिन पालकर हे २००४
सालापासून चिपळूणमध्ये होणाऱ्या सामान्य खंड्या
पक्ष्याच्या घरट्यांचे बारकाईने निरीक्षण करत होते. त्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि २.५ सेंमीच्या सूक्ष्म कॅमेऱ्यासारख्या अत्याधुनिक तंत्राचा वापर केला होता. या माध्यमातून त्यांनी धामणवणे, वालोपे या
गावांतील आणि दातार-बेहेरे-जोशी महाविद्यालयाच्या आवारात होणार्या सामान्य खंड्याच्या घरट्यांचे निरीक्षण करून नोंदी केल्या. प्रवण गोखले यांनी या नोंदींचे अवलोकन करून त्याआधारे सामान्य खंड्यांच्या प्रजननातील बारकाव्यांचा अभ्यास शास्त्रीय स्वरूपात
मांडला.
गेल्या २० वर्षांच्या काळात संशोधकांनी निरीक्षण केलेल्या २६ घरट्यांमध्ये २६३ अंडी आढळून आली.
त्यापैकी २४६ अंडी उबली. म्हणजेच तेवढी पिल्ले
जन्मास आली. त्यामुळे अंडी उबवण्याचा दर ९४ टक्के नोंदविण्यात आला. या २४६ पिल्लांपैकी २०९ पिल्ले मोठी झाली. या माध्यमातून पक्ष्यांच्या विणीच्या यशाचा दर ७९ टक्के नोंदविण्यात आला. अशा पद्धतीने शास्त्रीय
अभ्यास करून सामान्य खंड्याच्या विणीच्या यशाचा दर भारतामध्ये प्रथमच नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी हा 1 दर ब्रिटनमधून ८० टक्के, स्वित्झर्लंडमधून ५४ टक्के आणि जर्मनीमधून ५८ टक्के नोंदवलेला आहे. तसेच, सामान्य खंड्या हा जून ते ऑक्टोबर या महिन्यांतच वीण करत असल्याची नोंद या अभ्यासाअंती करण्यात आली आहे. यापूर्वी हा वीण हंगाम फेब्रुवारी ते सप्टेंबर महिन्यादरम्यान असल्याचे मानले जात होते.
प्रत्यक्ष घरट्यांमध्ये निरीक्षण
सीसीटीव्ही कॅमेऱ्याबरोबरीनेच २.५ सेंमीच्या सूक्ष्म कॅमेऱ्याचा वापर करून आम्ही घरट्यामध्ये सुरू असणाऱ्या हालचालींचे निरीक्षण केले.
घरट्याला कोणत्याही प्रकारे धक्का न पोहोचवता आणि महत्त्वाचे म्हणजे घरट्यात किंवा घरट्याच्या आसपास प्रौढ पक्षी नसतानाच आम्ही घरट्यामध्ये कॅमेरा टाकून निरीक्षणे टिपली. दिवसातून दोनवेळा आम्ही निरीक्षण टिपले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये घरट्यावर सापासारख्या शिकारी जीवांनी केलेले हल्लेदेखील टिपण्यात आले आहेत.
-सचिन पालकर,
पक्षी अभ्यासक चिपळूण