राजापूर दळे ग्रामपंचायत सरपंचांच्या विरोधात होळी गावातील महिलांचा आक्रमक पवित्रा
राजापूर/प्रतिनिधी:-तालुक्यात एकीकडे जलजीवन मिशन योजनेंतर्गत अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी होत असताना आता होळी सडेवाडीसाठी राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामातील गैरप्रकार व दळे सरपंचांची मनमानी या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या वाडीसाठी योजना राबविताना होळी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर सरपंचांनी मनमानी करत अनधिकृतपणे बसविलेला पाणीपुरवठा पंप काढून आणून थेट राजापूर ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयात जमा केला आहे.
दळे सरपंच महेश करंगुटकर यांची ही मनमानी आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देतानाच होळी सडेवाडीसाठी राबविण्यात येत जलजीवन मिशन योजनेसाठी स्वतंत्र विहिर व पंपहाऊस बांधून तेथून त्यांना पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली आहे. याबाबतचे एक निवेदन होळी गावातील महिलांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांना दिले आहे. तर यासाठीचे एक निवेदन २७ जुलै रोजी दळे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनाही दिले आहे.
ग्रुप ग्रामपंचायत दळे कार्यक्षेत्रात असणाऱ्या होळी गावात पुर्वी पासूनच होळी ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वयीत आहे. या योजनेतुन या गावातील ८३ कुटुंबाना नियमित पाणीपुरवठा होतो. अत्यंत चांगल्या प्रकारे स्थानिक ग्रामस्थ ही योजना राबवत असून यासाठी ग्रामपंचायत कोणतेही सहकार्य करत नाही.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत होळी सडेवाडी पाणीपुरठा दुरूस्ती योजना मंजूर करण्यात आली आहे. यासाठी सुमारे २५ लाख ३६ हजार रूपयांचा निधीही मंजूर आहे. या योजनेतुन सुमारे २१६ कुटुंबाना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. ही योजना राबविताना यासाठी स्वतंत्र विहिर व पंपहाऊसची निर्मिती करून योजना राबविणे आवश्यक असताना सरपंच यांनी आपली मनमानी करून जुनी योजना ज्या विहिरीवरून सुरू आहे त्या विहिरीत पंप लावून योजना राबविली आहे. याला ग्रामस्थांचा विरोध असतानाही सरपंच करंगुटकर यांनी मनमानी करत याच विहिरीत पंप टाकून योजना राबविण्याचा घाट घातला. एकाच विहीरीवर दोन पंप बसविण्यात आल्याने पुर्वीच्या योजनेवर परिणाम होऊन पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. एवढया मोठया प्रमाणावर निधी असतानाही अशा प्रकारे जुन्या योजनेच्या विहिरीत पंप टाकून पाणीपुरठा करण्याचा सरपंचांचा अट्टहास कशासाठी असा सवाल या महिलांनी उपस्थित केला आहे. मुळात योजनेची मुदत 31-3-24 रोजी संपलेली असताना 28-5-24 रोजी पंप टाकण्यात आला कसा असाही सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.
या विरोधात आता होळी गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत या विरोधात थेट पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर धडक दिली आहे. बुधवारी या महिलांनी या विहिरीत सरपंच करंगुटकर यांनी मनमानी करून बसविलेला दुसऱ्या योजनेचा पंप काढून आणून ग्रामीण पाणीपुरवठा विभागात आणून ठेवला आहे.
मुळातच ही योजना राबविताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आंम्ही सरपंचांची मनमानी खपवून घेणार नाही असा ईशारा या महिलांनी दिला आहे. अशा प्रकारे आंम्ही आमच्या पुर्वी पासून सुरू असलेल्या नळपाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत सरपंच यांनी मनमानी करून लावलेला पंप काढून् आणून आपल्या कार्यालयात जमा करत असल्याचे नमुद करत तसे निवेदन ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांना दिले आहे. या नवीन राबविण्यात येणाऱ्या योजनेसाठी स्वतंत्र विहिर व पंपहाऊस निर्माण करून त्यावरून ही योजना राबवावी असेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. या निवेदनावर सुनिता गुरव, प्रियांका गुरव, साक्षी शिरवडकर, सरीता गुरव, कविता गुरव, अलका गुरव, मंदा गुरव, रोशनी गुरव, रोहिणी कोर्लेकर, देवयानी कोर्लेकर,सविता गुरव, प्रमिला म्हादये यांसह महिलांच्या सहया आहेत.