खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील नव्या जगबुडी पुलापासून वेरळ-रेल्वेस्थानक फाट्यापर्यंत ओव्हरटेक करण्याच्या नादात गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने एसटी बसला धडक दिल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघाताने ठाणे-साखरपा बसचे प्रवासी खोळंबले. काही तासानंतर प्रवाशांना अन्य एसटी बसमधून साखरप्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आले.
मद्यधुंद अवस्थेतील ट्रक चालकाला एसटी बसचालकासह प्रवाशांनी चोप दिला. सायंकाळी उशिरापर्यंत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती. ट्रक (एम.एच. 46 बी.एफ. 2448) मुंबई येथून गोव्याच्या दिशेने जात होता. यादरम्यान, महामार्गावरून ठाणे आगारी ठाणे-साखरपा बस (एम.एच. 14 बी.टी. 3982) बस प्रवाशांना घेवून साखरप्याच्या दिशेने जात होती. ही दोन्ही वाहने भरणे येथील जगबुडी पुलानजीक आली असता ओव्हरटेक करण्याच्या नादात मद्यधुंद अवस्थेतील ट्रक चालक एसटी बसला घासत गेला. या प्रकाराने बसमधील प्रवासी भयभीत झाले. चालकाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर रेल्वेस्थानक फाट्यानजीक बस थांबवत ट्रक चालकाला केबिनमधून बाहेर खेचत चोप दिला. यानंतर पोलीस स्थानकात कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी करत ट्रक व एसटी बसेस रस्त्याच्या कडेला उभी करत चालकास ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.