लांजा:-फवारणीचे औषध प्राशन करून ६६ वर्षीय सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील विवली पागारवाडी येथे मंगळवारी रात्री १० ते बुधवारी सकाळी १० या कालावधीत घडली आहे. प्रकाश आप्पासाहेब खानविलकर (६६ लांजा) असे आत्महत्या केलेल्या वृध्दचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश खानविलकर हे लांजा एस.टी. आगारातून वाहतूक नियंत्रक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. प्रकाश खानविलकर यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. प्रकाश खानविलकर यांचा मुलगा लांजा एस.टी. आगारात मेकॅनिकल म्हणून कार्यरत आहे. तो आपल्या पत्नी मुलांसह लांजा येथे राहतो. तर प्रकाश खानविलकर हे दिवसभर आपल्या घरी विवली येथे राहून रात्री ते पुन्हा लांजा येथे मुलाकडे रहायला येत असत. मात्र मंगळवारी ते नेहमीप्रमाणे रात्री घरी आले नव्हते.
पाऊस खुप असल्याने कदाचित ते लांजा येथील घरी आले नसावेत असा अंदाज मुलगा प्रतीक याला आला. ते घरी का आले नाहीत हे पाहण्यासाठी मुलगा प्रतिक हा बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास विवली पागारवाडी येथील घरी गेला असता प्रकाश खानविलकर हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी फवारणीचे औषध प्राशन केल्याचे स्पष्ट झाले. त्यांना बुधवारी दुपारी लांजा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेची लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे हे करत आहेत.