राजापूर:-राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण बौद्धवाडी- सुतारवाडी रस्त्याला मधोमध बगदाड पडले आहे. या खड्ड्यामध्ये एक भुयार आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबतची माहिती चुनाकोळवणचे सरपंच श्रीकांत मटकर यांनी प्रशासनाला कळवली आहे. दरम्यान या प्रकाराची भूगर्भशास्त्रज्ञ मार्फत तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
चुनाकोळवण हद्दीतील बौद्धवाडी ते सुतारवाडीकडे जाणाऱ्या रहदारीच्या कच्च्या रस्त्याच्या मधोमध सुमारे पंधरा फूट खोल आणि दहा फूट रुंद खड्डा जमीन खचल्यामुळे तयार झाला आहे. त्या खड्ड्यामध्ये भुयारासारखा आकार दिसून येत आहे. ते पुरातन भुयारच असण्याची शक्यता येथील ग्रामस्थांनी वर्तविली असून त्यामुळे तेथील जमीन खचत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या अगोदर 10 वर्षांपूर्वी व गेल्या वर्षीही काही अंतरावर अशाच प्रकारचा खड्डा जमीन खचून तयार झालेला होता. जमीन खचण्याचे कारण समजू शकले नसल्याने याबाबतीत भूगर्भ शास्त्रज्ञांचे मार्फत तपासणी व्हावी जेणेकरून अशा या प्रकाराची उकल होईल, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.