मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
राजापूर : वारंवार अर्ज विनंत्या व पाठपुरावा करूनही राजापूर तहसिलदारांकडुन आपल्या प्रश्न सोडविले जात नसल्याने आपण १५ ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर आमरण उपोषण छेडत असल्याचे पत्र येथील मनसेचे कार्यकर्ते अमृत अनंत तांबडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.
याबाबतचे लेखी निवेदन श्री. तांबडे यांनी मुख्यमंत्र्याना पाठविले आहे. त्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये अनधिकृत काही कामे होत आहेत त्याला राजापूर तहसिलदार शितल जाधव यांचा पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राजापूरातील लोकांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्या अनधिकृत कामांना सवलत देत आहेत असे श्री. तांबडे यांनी निवेदनात नमुद केले आहे.
या निवेदनात त्यांनी जमीर खलिफे यांनी सी.एन.जी. पंपापासून सलग ३ डोंगर अक्षरशः निकामी केले आहेत. रात्रंदिवस जेसिबी पोकलेन लावून पूर्ण डोंगर गायब झाले आहेत सरासरी १९,२०० ब्रास उत्खनन झालेले आहे. तर त्याची रॉयल्टी भरली आहे का? किती भरली? तेथे कोणता झोन आहे कोदवली ग्रामपंचायत तसेच महसुल विभाग यांच्याकडून परवानगी घेतली का? याबाबत चौकशीची मागणी केली आहे. तसेच डोंगर गावामध्ये नविन झालेली काझी बिल्डींग या बिल्डिंगला विना परवाना बांधकाम करण्यात आले असून तहसिलदार शितल जाधव यांच्या आशिर्वादानेच हे ही काम झाले आहे असे त्यांनी या निवेदनात नमुद केले आहे.
तसेच राजापूर गाळ उपसा यामध्येसुध्दा फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्याबाबत चौकशी व्हावी. तहसिलदार शितल जाधव या प्रकरणात मुग गिळून गप्प बसलेल्या आहेत. त्याचबरोबर राजापूर पुनर्वसन कोदवली यामध्ये अनधिकृत बांधकाम तसेच हे पुनर्वसनासाठी दिलेल प्लॉट सरकार जमा करा किंवा जे खरे मालक आहेत त्यांना घरे बांधण्यासाठी पी. एम. घरकुल आवास योजना मिळावी. १५ ऑगस्ट पर्यंत या मागण्यांबाबत विचार न झाल्यास आपण मंत्रालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे श्री. तांबडे यांनी या निवेदनात नमुद केले आहे.