चिपळूण : चिपळुणात दोन तरुणांच्या अचानक मुत्युंच्या घटनेने तालुका हळहळला आहे. दोन दिवसांपूर्वी एका शरीरसौष्ठवपटूचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका तरुणाचे बुधवार 31 जुलै रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. राजू किसन जाधव (३८, बावशेवाडी) असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. आणखी मोठं दुर्दैव म्हणजे तीन वर्षांपूर्वी कोरोनाच्या लाटेत त्याच्या मोठ्या भावाचे निधन झाले होते. त्यानंतर आता अचानकपणे राजुही हे जग सोडून गेल्याने जाधव कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.
राजू हा शहरातील प्रसिद्ध फोटोग्राफर होता. मितभाषी आणि सर्वांसोबत सलोख्याचे संबंध असणाऱ्या राजुने फोटोग्राफी व्यवसायात नाव कमावले होते. काल मंगळवारी रात्री त्याच्या छातीत जळजळ होऊ लागली. पित्ताच्या त्रासाने हे होत असावे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करून राजूने तो त्रास अंगावर काढला. परंतु आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्याचा मृत्यू झाला.
तीन वर्षांपूर्वी राजुचा मोठा भाऊ रुपेश याचे कोरोनाच्या महामारीत निधन झाले होते. आता राजूचाही मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राजुच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.