रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या 149 पदासाठी सुरु असलेल्या भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या एकूण 1616 उमेदवारांपैकी 1562 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली आहे. लेखी परीक्षेचे गुणांकन जाहीर करण्यात येऊन आक्षेप नोंदविण्याची संधी उमेदवारांना देण्यात आली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
चालक व बॅन्डसमनच्या रिक्त 30 पदासाठी बुधवारी लेखी परीक्षा होणार आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदांसाठी सुरु असलेल्या भरती प्रक्रियेत नुकतीच लेखी परीक्षा पार पडली. एकास दहा प्रमाणे उमेदवार लेखी परीक्षेसाठी निश्चित करण्यात आले होते. जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदांसाठी 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. 149 पदांसाठी 8 हजार 713 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. यावेळी प्रथमच आलेल्या प्रत्येक उमेदवाराचे फेस स्कॅन करुन त्याला मैदानावर प्रवेश देण्यात आला.
15 जुलैपर्यंत मैदानी चाचणीची प्रक्रिया सुरु होती. त्यानंतर लेखी परीक्षा पार पडली. त्यांची गुणवत्ता यादी पोलीस दलाच्या नोटीस फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुढील काही दिवस उमेदवारांना लेखी परीक्षेतील गुणांकनाबाबत काही आक्षेप असतील तर ते नोंदवता येणार आहे. त्यानंतर आरक्षणनिहाय अंतिम निवड यादी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
यावर्षी मुसळधार पाऊस असतानाही याच कालावधीत भरतीची प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशांची अंमलबजावणी करत राज्यभरातून आलेल्या उमदेवारांची कोणत्याही प्रकारची गैरसोय किंवा भरती प्रक्रियेत पावसामुळे त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली होती. भरतीसाठी आलेल्या मुले, मुली यांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था शहरातील मंगल कार्यालयामध्ये करण्यात आली होती. त्यामुळे भरती प्रक्रिये दरम्यान कोणतीही अडचण निर्माण झाली नसल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.