आता मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांनाही मोफत गॅस सिलेंडर
रत्नागिरी:-राज्यशासन सर्वसामान्यांसाठी आता नवनवीन योजना आणत आहे. आता आणखी एक योजना राज्य शासनाने आणली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना. या योजनेतून लाभार्थ्यांना वर्षभरात एकुण सिंलेंडर पैकी 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
राज्य शासनाने 30 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना जाहीर केली. या योजनेनुसार राज्यातील आता लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात या तीनही सिंलेंडरच्या पुनर्भरण (रिफीलींग) चे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत. तसेच लाभार्थी कुटुंबाने या योजनेनुसार सिंलेंडर पुनर्भरण केले की नाही याची तेल कंपन्यांकडुन खातरजमा करण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारचे 300 रुपये आणि राज्यशासनाचे 530 रुपये जमा करण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 830 रुपये इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेनुसार सिंलेंडर पुनर्भरण केव्हा केले याची माहिती संबंधित कंपन्यांनी प्रत्येक महिन्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे सादर करायची आहे.