रत्नागिरी:- समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अशिक्षित, कष्टकरी महिलांना मार्गदर्शन व आर्थिक साह्य करून रत्नागिरी जिल्हा महिला पतसंस्थेने त्यांची समाजात पत निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन पतसंस्थेच्या अध्यक्षा युगंधरा राजेशिर्के यांनी केले.
महिला पतसंस्थेची ३३ वी वार्षिक सभा रत्नागिरी जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, दिवंगत खासदार गोविंदराव निकम यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या महिला पतसंस्थेची घोडदौड सुरू आहे. संस्था तेहतिसाव्या वर्षात पदार्पण करत असून आजच्या स्पर्धेच्या युगात व्यावहारिकतेसह सामाजिक कार्यालाही संस्थेने महत्त्वाचे स्थान दिले आहे.
व्यासपीठावर माजी संचालिका ज्योत्स्ना कदम, संचालिका स्वप्ना सावंत, सरिता बोरकर, प्राची शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी कृतिका सुवरे उपस्थित होत्या. सभेसाठी महिला सभासद आवर्जून आल्या होत्या.
पतसंस्थेच्या माजी अध्यक्ष, संचालिका आसावरी शेट्ये यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आर्या कदम, मनस्वी सुरजन, ऋषभ कोतवडेकर, वेदांग जोशी या संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचे अभिनंदन केले. सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या पिग्मी प्रतिनिधी नेत्रा सागवेकर, नीता धुळप, हर्षद कोतवडेकर, सावर्डे शाखाधिकारी संजीवनी वारे यांना गौरवण्यात आले. यंदा प्रथमच सावर्डे शाखेला सर्वोत्कृष्ट शाखा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
व्यवस्थापक आदिती पेजे यांनी मागील वर्षीच्या सभेचे इतिवृत्त वाचन केले. वार्षिक सभेतील ठराव वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी कृतिका सुवरे यांनी केले. खेळीमेळीच्या वातावरणात सर्व ठराव मंजूर करण्यात आले.