चिपळूण:-काही दिवसांपूर्वी शहरात भर बाजारपेठेतील शिवनदी पुलाजवळील रस्त्यावर मगर फिरत असताना आढळल्यानंतर गुरूवारी रात्री 11.45 च्य सुमारास चक्क पेट्रोलपंपावर मगर आढळली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
पाऊस सुरू झाल्यापासून शहरात मगरींचा वावर वाढत आहे. वनविभागाकडून त्या बाबत जनजागृती कार्यक्रमही हाती घेण्यात आले आहेत. गुरूवारी रात्री पुन्हा शहरातील मेहता पेट्रोल पंपावर एक मगर फिरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या बाबत बंटी गुढेकर यांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वनविभागाला कळवले. त्यानंतर वनरक्षक राहुल गुंठे, मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट, वाहनालक नंदकुमार कदम, सर्पमित्र शिवराज शिर्के यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून या मगरीस सुरक्षितरित्या पकडून सुस्थितीत असल्याची खात्री करून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.