महावितरणचे अधिकारी फोनही उचलत नाही आणि जनतेला कारणही सांगत नाहीत
संगमेश्वर:-मुसळधार पावसात संगमेश्वर तालुक्यासह खाडी पट्ट्यातील गावांमध्ये जवळपास दीड दिवस वीज पुरवठा खंडित आहे. यामुळे नागरिक प्रचंड संतप्त झाले आहे. महावितरणच्या नावाने लाखोल्या वाहत आहेत. आज सकाळी 10 वाजे पर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत होऊन महावितरण कार्यालयावर धडकण्याची शक्यता अनेकांनी नाव न टाकण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.
जवळपास ४० तास ग्रामीण भागात विज नसल्याने पंचक्रोशीतील नागरीकांचे मोबाईल आणि इलेक्ट्रिक वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद आहेत. मोबाईलला चार्जिंग नाही त्यामुळे संपर्क होऊ न शकल्याने अनेकजण संतप्त झाले आहेत.
तसेच फ्रिज, वॉशिंग मशीन बंदावस्थेत आहेत. नागरिकांच्या घरात पिण्याच्या पाण्याचा थेंब नाही, आणि पावसामुळे घरातून बाहेरही पडता येत नाही. त्यामुळे कुचंबणा होत आहे. दिवस कसातरी प्रकशात जातो. मात्र रात्रीच्या वेळी अंधारात वेळ काढणे अतिशय कठीण झाले आहे. नागरिकांना अंधारात चाचपडावे लागत आहे. वृद्धांसह लहान मुलांचे हाल होत आहे. महावितरण कार्यालयात फोन केला तर उचलला जात नाही. काही आणि फोन उचलला तर काही तासात वीज पुरवठा सुरळीत होईल असे सांगितले जाते. मात्र ४० तास उलटूनही परिसरात वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. उद्या सकळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर जन आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
एवढा मोठा काळ वीज पुरवठा खंडित असूनही महावितरण कार्यालयाकडून नागरिकांना कोणतीही सूचना किंवा मेसेज देण्यात आलेला नाही. डिजिटल मीडियाच्या या दुनियेत संगमेश्वर महावितरणला लोकांना कळवणे अवघड जागेचे दुखणे झाले असावे अशी भावना व्यक्त होत आहे.
बुधवार पासून वांद्री,उक्षी,तळेकांटे,कानरकोंड आंबेड, सोनगिरी,तसेच डींगणी, फुणगुस या गावांत वीज नाही आहे.मात्र ढिम्म महावितरणकंपनी कडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही आहे.