लांजा : तालुक्यातील रिंगणे, कोंडगे ते झर्ये दरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. कुरंग बांधवाडी ब्रिजवर मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे. रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत असल्याने अपघात होण्याची भिती आहे मात्र संबधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रिंगणे, कोंडगे, झर्ये रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहने कसरतीने चालविण्यास भाग पडत आहे. दुचाकीस्वार खड्यात पडून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. रिंगणे कोंड येथे बसस्टॉप वर खड्ड्याचे सर्वांधिक प्रमाण जास्त आहे. खड्डे बुजवण्यासाठी कित्येक दिवसापासून चिरे ठेवलेत मात्र संबधित प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे. येत्या गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची डागडुजी केली जाईल का? असा सवाल या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शरद आयरे यांनी केला असून दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.