खेड:-रत्नागिरी व सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटातील रस्ता खचल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. रस्त्याचा काही भाग थेट दरीत कोसळला आहे. रस्ता खचल्याने रघुवीर घाटातील वाहतूक तातडीने बंद करावी, अशी मागणी खोपी ग्रामस्थांनी केली आहे.
पर्यटकांसाठी आकर्षणा केंद्रबिंदू असलेल्या रघुवीर घाटात ‘विकेंड’ला गर्दी उसळते. घाटात उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीमुळे मार्ग सुस्थितीत असल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र घाटात संरक्षक भिंतीसाठी 7 कोटी रूपयांचा निधी खर्चूनही रस्ता खचून काही भाग दरीत कोसळल्याची बाब समोर आली आहे. खालेल्या रस्त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय 24 गावांचा संपर्क तुटण्याची दाट शक्यता आहे. या मार्गावरून खेड-अकल्पे बसफेरी धावत असते. या बसफेरीमधून विद्यार्थी खोपी हायस्कूलमध्ये येत असतात. त्यामुळे धोका टाळण्यासाठी वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे.