चिपळूण:-मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता, पूल खचण्याचे, बांधकामाना तडे जाण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने महामार्गावरील प्रवास सुरक्षेचा राहिलेला नाही. निकृष्ट कामांमुळे हे प्रकार सातत्याने घडत असल्याने मंगळवारी रात्री शिवसेना उबाठा गटाचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक, ग्रामस्थानी परशुराम घाटात सत्य नारायणाची महापूजा मांडत अनोख्या पध्दतीने आंदोलन केले आणि महामार्ग विभाग आणि कंत्राटदार कंपनीचा निषेध केला.
महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे शिवसेना उबाठाने संताप व्यक्त केला आहे. एक तर महामार्गाचे काम पूर्ण होत नाही. झालेले कामही निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. त्यामुळे या महामार्ग बांधणीत भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करून दोषींना शिक्षा करावी अशी मागणी करत उबाठाच्या सावंत यांनी शिवसैनिक व पेढे, परशुरामच्या ग्रामस्थांसमवेत मंगळवारी रात्री 9 वा. परशुराम घाटात बंद मार्गिकेवर पूजा मांडत महामार्गावरील अडचणीचा प्रवास सुखकर करो, अशी प्रार्थना केली.
यावेळी सुरेश बहुतुले, संतोष चोपडे, आनंद खैर, विजय नेवरेकर, अविनाश सावंत, चिराग सावंत तसेच युवासेना कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.