रत्नागिरी:-सिंधू-सरस्वती संस्कृती भारतीयांनीच वसवली, असे प्रतिपादन संशोधक ऋत्विज आपटे यांनी केले.
अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात ‘इतिहास: शोध आणि बोध’ अभियान मंडळाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
‘अभ्यास: इतिहास आणि पुरातत्त्वाचा’ या विषयावर त्यांनी विवेचन केले.
श्री. आपटे यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे संस्कृत विषयात पदवी घेतली आहे. डेक्कन महाविद्यालयात प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्त्व या विषयात पदविका संपादन केली आहे. गेली नऊ वर्षे ते पुरातत्त्वशास्त्र या विषयात व कोकणातील कातळशिल्पांवर काम करत आहेत. सध्या ते आयआयटी, मद्रास येथे रिसर्च असोसिएट आणि मुंबई विद्यापीठातील सीइएमएस येथे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी डेक्कन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. वसंत शिंदे यांच्यासोबत सिंधू संस्कृतीच्या राखीगडी या क्षेत्रावर उत्खननाचे काम केले आहे. रत्नागिरीतील व्याख्यानात त्यांनी पुरातत्त्वातील नवीन संशोधनावर प्रकाश टाकत ही नवीन संशोधने इतिहासलेखनाला कशी सहाय्यभूत ठरतात, याविषयी उदहरणे देत माहिती दिली. आंध्र प्रदेशातील मल्लपट्टूगुडू येथे उत्खननात ५० हजार वर्षांपूर्वीचे शहामृगाचे अंड्याचे घरटे सापडले. त्याच्या शेजारील परिसरात दगडी हत्यारे सापडली. इंडोनेशियात जगातील सर्वांत प्राचीन ५१ हजार वर्षांपूर्वीचे भित्तीचित्र सापडले आहे. सिंदखेडराजा येथे लखुजी जाधव यांच्या वाड्याशेजारी अकराव्या शतकातील शिवमंदिर व शेषाशाही विष्णूची मूर्ती सापडली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे २०१५मध्ये सिंधू संस्कृतीच्या राखीगडी या ठिकाणी उत्खनन करताना ७० मानवी सांगाडे सापडले. त्यापैकी एका सांगाड्यातून डीएनए प्राप्त करण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले आहेत. तो डीएनए आजच्या भारतीय डीएनएसोबत जुळतो. यावरून सिंधू संस्कृतीतील रहिवासी बाहेरून आले नव्हते तर ते मूळचे भारतीय आहेत हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सांगितले की, इतिहास हा काय करावे आणि काय करू नये हे आपलाल्या शिकवतो. त्याच्याकडे डोळसपणे पहिले की आपल्या वर्तमानकाळातील विविध समस्यांचे उपाय सहज सापडतात. मंडळाच्या वर्षभरातील विविध उपक्रमांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत ‘इतिहास: शोध आणि बोध’ अभियान मंडळाचे समन्वयक प्रा. निनाद तेंडुलकर यांनी केले. उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर यांनी आपल्या मनोगतात वर्षभरातील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.