मुंबई:-उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या अनुषंगाने सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांना जाब विचारण्याचे सांगितले.
सामंत म्हणाले की, राज्य सरकारने नेहमीच मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक पाऊले उचलली आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजातील अनेकांना दाखले आणि नोंदी मिळाल्या आहेत. राज्य सरकारने अवघ्या १२ दिवसांत ३३७ कोटी रुपये खर्चून १ कोटी ५८ लाख घरांचे सर्वेक्षण केले, हे जगात पहिल्यांदाच इतक्या वेगाने आणि व्यापक प्रमाणात झालेले सर्वेक्षण आहे.जरांगे पाटील यांनी सरकारच्या सकारात्मक पावलांचा विचार करावा, असे आवाहन सामंत यांनी केले. मराठा किंवा ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, याची खात्री त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत गैरसमज न पसरवण्याचे आवाहन करताना, फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे सामंत म्हणाले.सामंत यांनी विरोधी पक्षांना दोन दिवसांत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचे की नाही, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले. महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाबाबत योग्य बाजू मांडली नसल्यामुळे आरक्षण रद्द झाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.