विरोधकांच्या टीकेला रेल्वेमंत्र्यांचे उत्तर
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (23 जुलै) देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना तरुण, महिला आणि शेतकर्यांसाठी अनेक योजना जाहीर केल्या. आपल्या 83 मिनिटांच्या भाषणात केवळ एकदाच रेल्वेचा उल्लेख केला.
केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची टीका विरोधकांकडून होत असताना आज, बुधवारी (24 जुलै) रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वाधिक भांडवली खर्च असलेला अर्थसंकल्प आहे. नवे रेल्वेमार्ग तयार करणे, रेल्वे रुळांचे दुपदरीकरण आदींवर खर्च केला जाणार आहे. त्यातही केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वेसाठी 15,900 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, आधी यूपीए सरकारच्या काळात रेल्वेला 11 हजार कोटींचा निधी मिळायचा. यंदा रेल्वेच्या तरतुदीत 13.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रेल्वेकडून महाराष्ट्रात 1 लाख 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. पुढील एका वर्षात 130 किमी लांबीचे नवीन मार्ग तयार होत आहेत. 128 स्थानकांचा अमृत भारत योजनेंतर्गत पुनर्विकास केला जात आहे. 929 रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे कामदेखील सुरू आहे. राज्यातील 100 टक्के रेल्वे जाळे इलेक्ट्रिक झाले आहे. राज्यातील बुलेट ट्रेनकडे केवळ वाहतुकीचे माध्यम म्हणून पाहू नका, तर महत्त्वाच्या शहरांना जोडणारी सुविधा म्हणून पाहा. एकूण 508 किमीचा हा प्रकल्प आहे. मुंबईतील बीकेसी येथून सुरू होणारी बुलेट ट्रेन अहमदाबादमधील साबरमती येथे संपते. समुद्राखालील मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहितीदेखील वैष्णव यांनी दिली.
दरम्यान, मुंबईतील उपनगरीय लोकलसंदर्भात माहिती देताना अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज 3200 लोकलच्या फेर्या सुरू आहेत. यापैकी 1400 पश्चिम रेल्वे आणि 1800 मध्य रेल्वेवरील फेर्यांचा समावेश आहे. मध्य रेल्वे मार्गावरून दररोज 35 लाख आणि पश्चिम रेल्वेतून दररोज 40 लाख असे एकूण 75 लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वेमार्गावरील भार कमी करण्यासाठी पाचवी आणि सहावी मार्गिका उभारण्याचे काम सुरू आहे. कुर्ला ते परळदरम्यान पुढील 3 वर्षांत ही मार्गिका उभारली जाईल. मार्गिका उभारणीत जमीन अधिग्रहण हा विषय नाही. या मार्गिकेदरम्यान सायन आणि धारावीचा उड्डाणपूल आहे. त्यापैकी सध्या सायन उड्डाणपुलाचे पाडकाम सुरू आहे. नंतर धारावी पुलाचे पाडकाम होईल. याशिवाय परळ ते सीएसएमटीदरम्यान जमीन अधिग्रहणाचा विषय येणार नाही.