नवी दिल्ली : दिल्लीतील न्यायालयाने यूट्यूबर ध्रुव राठीला समन्स बजावले आहे. भाजप नेते सुरेश नखुआ यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात ध्रुव राठीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
भाजप नेते सुरेश नखुआ यांनी आरोप केले आहेत की, ध्रुव राठीने केलेल्या एका व्हिडीओमध्ये सुरेश नखुआ यांचा उल्लेख, ‘हिंसक आणि अपमानास्पद’ ट्रोल म्हटले होते.
बार आणि खंडपीठाने दिलेल्या अहवालानुसार, साकेत न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश गुंजन गुप्ता यांनी 19 जुलै रोजी ध्रुव राठीच्या नावाने समन्स जारी केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. न्यायालयाने त्याला स्पीड पोस्ट, कुरिअर तसेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने समन्स पाठवण्यास सांगितले आहे. नेते सुरेश नखुआच्या वतीने वकील राघव अवस्थी आणि मुकेश शर्मा यांनी बाजू मांडली. यावेळी ध्रुव राठीने सुरेश नखुआ यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सदर व्हिडीओमधून केल्याचा दावा केला आहे. भाजप नेते सुरेश नखुआ यांच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले की, ध्रुव राठीने त्यांच्याबद्दल भडकाऊ व्हिडिओमध्ये बिनबुडाचे आरोप केले आहेत. ध्रुव राठीने हिंसक आणि अपमानास्पद ट्रोलिंगमध्ये सहभागी असल्याचे आरोप केले आहेत. ध्रुव राठीच्या या आरोपांमुळे मला टीकेला सामोरे जावे लागल्याचे सुरेश नखुआ यांनी सांगितले.
ध्रुव राठी हा एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. यूट्यूबवरील त्याच्या चॅनलवर तो विविध विषयांवर भाष्य करत असतो. गेल्या काही महिन्यांमध्ये खासकरून लोकसभा निवडणुकीच्या काळात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात अनेक व्हिडीओ बनवले होते. यामुळे तो वादामध्ये सापडला होता. भाजपकडून त्याच्यावर एकतर्फी व्हिडीओ बनवल्याचा आरोप होत आहे. तसेच, भाजपचा कट्टर विरोधी म्हणून संबोधले जात आहे. त्याचे यूट्यूबवर 23 दशलक्षाहून अधिक सदस्य आहेत. तसेच तो ट्विटवर सर्वाधिक प्रसिद्ध आहे.