गुहागर:-गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गुहागर तालुक्यातील अडूर-बुधल गावी मुख्य रस्त्यावर दरड कोसळून प्रचंड नुकसान झाले आहे. बुधवारी दि.२४ जुलै रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास बुधल घाटी याठिकाणी मुख्य रस्त्याच्या लगत असलेल्या महावितरणच्या विद्युत खांबावर दरड कोसळून संपूर्ण रस्त्यावर दरड, विद्युत खांब व तारा, झाडी, माती पसरल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
बुधल गावावरून वस्तीला असणारी शालेय विद्यार्थांना घेऊन जाणारी बुधल-गुहागर एस.टी या मार्गावरून घटनेच्या काही मिनिटापूर्वी येथून मार्गस्थ झाली होती. सुदैवाने घटनेच्या काही वेळा पूर्वी याठिकाणावरून ही बस सुटल्याने मोठी दुर्घटना टळली. दुर्घटना स्थळ परिसरात बेकायदेशीर माती उत्खनन झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे पावसात दरड कोसळल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चिले जात आहे.