चिपळूण:-मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात रस्त्याला तडे जाण्याबरोबरच काही ठिकाणचे काँक्रिट निघाल्याने एक मार्गिका वाहतुकीस बंद करण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील एक मार्गिका वाहतुकीस बंद करून दुसऱ्या मार्गिकेवर वळवण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिक, वाहनालकांतून संताप व्यक्त होऊ लागला आहे.
गेल्या आठवड्यात सावर्डे-वहाळ फाट्यावरील उड्डाणपुलावरील रस्ता खचण्याबरोबरच बांधकामांना ठिकठिकाणी तडे गेल्याने हा पूलच वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. खेडमधील जगबुडी पुलापाठोपाठ आता मंगळवारी बहाद्दूरशेख नाका पुलावरील एक्सपान्शन जॉईंटचे काँकिट निघून लोखंड बाहेर आले आहे. हा सारा प्रकार माजी सभापती शौकत मुकदम यांनी उघडकीस आणून राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्याना धारेवर धरले. तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय का? तुम्हांला काही दिसत नाही का? झोपा काढत आहात का? अशा शब्दात ठणकावल्यानंतर आता या पुलाची एक मार्गिका वाहतुकीस बंद करून ती वाहतूक दुसऱ्या मार्गिकेवरून वळवण्यात आली आहे.