लांजा : गेले दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने तालुक्यातील विविध ठिकाणी गोठे आणि घरांचे लाखोचे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर थोडासा कमी झाला असला तरी तालुक्यातून वाहणारी काजळी नदी सोमवारी सायंकाळ पर्यंत इशारा पातळीवर वाहत होती.
तालुक्याला मागील दोन दिवस पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जराही उसंत न घेता पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील घरांचे ५५,२५० आणि गोठ्यांचे ४७,२४० असे घरे व गोठ्यांचे एकूण १ लाख २ हजार ४९० रूपयांचे नुकसान झाले आहे.
या पावसाचा फटका महावितरणला देखील बसला असून तालुक्यात सहा विजेचे खांब पडले आहेत. निवसर येथे विजेचे तीन खांब, पन्हळे गावी एक, केळंबे गावी दोन, तर खेरवसेत एक खांब पडला आहेत. अशा विविध ठिकाणी विजेचे खांब पडले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.