रत्नागिरी:-येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे. सप्ताहाचे हे १३ वे वर्ष आहे. येत्या ५ ते ११ ऑगस्ट या कालावधीत दररोज सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत हा सप्ताह मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात होणार आहे.
पहिल्या दिवशी, ५ऑगस्टला गोव्याचे हभप त्रैलोक्यबुवा जोशी हे शिवतत्त्व (शिवभोळा चक्रवर्ती) धनेश्वर आख्यानावर कीर्तन करणार आहेत. बीएसस्सी, एमबीएचे शिक्षण झालेल्या बुवांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून महाराष्ट्र, कर्नाटकात २०० हून अधिक कीर्तने केली आहेत.
दुसऱ्या दिवशी, ६ ऑगस्टला राष्ट्रीय कीर्तनकार पुण्यातील संदीप मांडकेबुवा फिरंगोजी नरसाळा आख्यानविषयावर कीर्तन करतील. कालिदास विद्यापीठाची शास्त्री पदवी मिळालेले बुवा मांडके विद्यानंद कीर्तनकार, शिवराज्य कीर्तनकार पुरस्कारांनी सन्मानित असून १८०० हून अधिक कीर्तने त्यांनी केली आहेत.
सात ऑगस्टला राजापूरच्या नवोदित व युवा कीर्तनकार हभप सौ. जान्हवी परांजपे संत तुलसीदास या आख्यानविषयावर कीर्तन करतील. बीएस्सी, बीएड पदवी प्राप्त सौ. परांजपे यांनी गायनाचे शिक्षण व कीर्तनाचे शिक्षण घेतले आहे.
आठ ऑगस्टला हेदवी (गुहागर) येथील डॉ. श्रीपाद जोगळेकर सुधन्वाला श्रीकृष्ण दर्शन या विषयावर कीर्तन सादर करणार आहेत. डॉ. जोगळेकर व्यवसायाने डॉक्टर असून त्यांनी वाचन, अनेक बुवांची कीर्तने ऐकून कीर्तनाला प्रारंभ केला. गेल्या २२ वर्षांत त्यांनी १५०० हून अधिक कीर्तने केली आहेत.
नऊ ऑगस्टला कोळंबे येथील सायली मुळ्ये-दामले संत वेण्णास्वामी यांच्यावर कीर्तन सादर करतील. शास्त्रीय संगीत विशारद, कीर्तन अलंकार पदवीप्राप्त सायली दामले यांनी दिग्गज बुवांकडे मार्गदर्शन घेतले आहे. संगीत नाटकांतूनही त्या भूमिका करतात. राज्यस्तरीय कीर्तन स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक मिळाला असून ३०० हून अधिक कीर्तने केली आहेत.
दहा ऑगस्टला पुण्याच्या हभप डॉ. सौ. अवंतिका टोळे संत रोहिदास आख्यानविषयावर कीर्तन करतील. डॉ. टोळे यांनी तिरुपतीच्या राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठातून संस्कृत व्याकरणात पीएचडी केली आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून त्या कीर्तन करत आहेत. भारत सरकारतर्फे नाट्यसंगीतात शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे.
सप्ताहातील अखेरचे कीर्तन रविवारी, ११ ऑगस्टला असून माजलगाव (बीड) येथील युवा कीर्तनकार लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी (पटवारी) स्वामी विवेकानंद आख्यान विषयावर निरूपण करतील. ते इयत्ता सहावीपासून कीर्तनसेवा करत आहेत. बालकीर्तनरत्न, युवा कीर्तनकार पुरस्काराने ते सन्मानित आहेत. भागवतकथा, श्रीरामकथा, प्रवचने व्याख्यानेसुद्धा सादर करतात.
या सप्ताहात ऑर्गनसाथ श्रीरंग जोगळेकर, विजय रानडे, श्रीधर पाटणकर, संतोष आठवले, निरंजन गोडबोले, बाळ दाते, चैतन्य पटवर्धन आणि तबलासाथ प्रथमेश शहाणे, कैलास दामले, पुष्कर सरपोतदार, स्वरूप नेने, वरद जोशी (कुर्धे), निखिल रानडे करणार आहेत. कीर्तन सप्ताहातील एखाद्या कीर्तनास मदत करून सेवा रुजू करायची असल्यास मंडळाशी (9325100151) संपर्क साधावा. हा कीर्तन सप्ताह विनामूल्य असून जास्तीत जास्त कीर्तनप्रेमींनी या कीर्तन सप्ताहाला उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने केले आहे.