रत्नागिरी कुवारबाव परिसरात कचरा फेकणाऱ्यावर ग्रामपंचायत लावणार चाप
रत्नागिरी नगर परिषदेनेही शहरात सीसीटिव्ही लावले, मात्र कारवाई झाली का?
रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव ग्रामपंचायतने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यावर चाप लावण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली आह़े. टाकाल उघड्यावर कचरा तर असतील तुमच्यावर सीसीटिव्हीच्या नजरा असा संदेश ग्रामपंचायतीने कचरा फेकणाऱ्याना दिला आहे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्याना आता कायदेशीर दंडात्मक कारवाईबरोबरच फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. तसे फलक कुवारबाव, साईनगर, रवींद्रनगर या भागात लावण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील दुर्गंधीला आळा बसणार असल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आह़े.
पत्रकार कॉलनीजवळील नाल्यात व पत्रकार कॉलनीजवळून सुयोग सोसायटीकडे पाण्याच्या टाकी जवळून जाणाऱ्या रस्त्याच्या आजूबाजूच्या अपार्टमेंटमधील परिसरातील रहिवासी, व्यापारी, दुकानदार मोठ्या प्रमाणात कचरा फेकून दुर्गंधी निर्माण करीत असतात. त्यामुळे या भागात हिवताप, डेंग्यू, यासारख्या साथीचे प्रमाण वाढत आहे. शिवाय टाकलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी मोकाट गुरे आणि मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. शिवाय नाल्यात टाकलेल्या कचऱ्यामुळे तिथून वाहणाऱ्या ओढ्याचे पाणी खालील भागात असलेल्या विहिरी आणि तलावामध्ये जाऊन पिण्याच्या पाण्याचे साठे प्रदूषित होत आहेत. या भागातील उत्कर्षनगरपासूनचे स्वत:ला उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित समजनारे रहिवासी आपल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनातून येता-जाताना बेशिस्तपणे कचरा फेकत असतात. अशा सर्वच बेशिस्त नागरिकांना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे शिस्त लागणार आहे. ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याबद्दल येथील रहिवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नक्की कारवाई होणार का?
रत्नागिरी नगर परिषदेनेही अशाच प्रकारचे सीसीटिव्ही कॅमेरे शहर परिसरात लावले होते. मारुती मंदिर, भाजी मार्केट, पऱ्याची आळी आदी कचऱ्याच्या ठिकाणी हे कॅमेरे बसवले होते. मात्र या ठिकाणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. किंवा नगर परिषदेने तसे सांगितलेही नाही त्यामुळे नक्की कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारवाई होणार नसेल तर सीसीटिव्ही बसवून फुकटचा खर्च कशाला करताय असेही बोलले जात आहे.