लांजातील काजळी नदीने पुन्हा धोका पातळी ओलांडली
लांजा:गेले दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे लांजा तालुक्यातील काजळी नदीला पूर आला आहे. काजळी नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यातील प्रमुख नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
पावसाने लांजा तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला. तर रविवार २१ जुलै रोजी काजळी नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे तसेच काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पूल दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास वाहतुकीस बंद करण्यात आला. त्यामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.