चिपळूण:-शहर बाजारपेठेतील एका भांडी व्यावसायिकासह अन्य तीन दुकानातून मोबाईल चोरट्यांच्या टोळीने मोबाईल चोरल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. ही टोळी दुकानात शिरल्यानंतर 8 ते 10 वर्षांची लहान मुले मोबाईल चोरत आहेत. या मोबाईल चोरीचे सीसीटिव्ही फुटेजचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असून व्यावसायिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन केले जात आहे.
काही दिवसांपासून शहर बाजारपेठेत एक मोबाईल चोरीची टोळी सक्रिय झाली असून त्यामध्ये 8 ते 10 वर्षाच्या लहान मुलांचा प्रामुख्याने समावेश आहे. या टोळीतील मोठी व्यक्ती एखाद्या दुकानात शिरल्यानंतर त्यांच्यासमवेत ही मुले देखील त्या दुकानात जात आहेत. मोठी व्यक्ती व्यावसायिकांना बोलण्यात गुंतवून ठेवून लहान मुले दुकान व्यावसायिकांची नजर चुकवून थेट मोबाईल चोरत आहेत. तसे पाहिल्यास येत्या 2 दिवसात खेर्डीसह चिपळूण बाजारपेठत एकूण 4 घटना घडल्या असून त्यात शुक्रवारी जुना बसस्थानक परिसरातील एका भांडी व्यावसायिकाचा मोबाईल चोरस गेल्याची घटना पुढे आली आहे. या मोबाईल चोरीच्या घटनेनंतर या चोरीचे सीसीटिव्ही फुटेज दुकान व्यावसयिकांनी तपासले असता हा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे. या मोबाईल चोरीतील टोळीचे सीसीटिव्ही फुटेजचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले आहेत. चिपळूण पोलीस स्थानकात त्या मोबाईल मालकांनी चोरीच्या तकारी दिल्या असल्याची माहिती व्यावसायिक देत आहेत.