दापोली न. पं.कडे अग्निशमन बंब नसल्याने खेडमधून मागवला बंब तोपर्यंत घर बेचिराख
दापोली : तालुक्यातील कर्दे- खैराचा कोंड येथील जनार्दन पेवेकर यांचे घर भर पावसात लागलेल्या आगीत जळून खाक झाले. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दापोली नगर पंचायतीकडे अग्निशमन बंब नसल्याने खेड नगरपरिषदेचा बंब येईपर्यंत संपूर्ण घर बेचिराख झाले. यामुळे पावसात पेवेकर यांचा संसार उघड्यावर आला आहे. सुदैवाने पेवेकर कुटुंबिय यावेळी घराबाहेर गेले असल्याने मोठी दुर्घटना टळली.
दापोली तालुक्यातील मुरुड-कर्दे गावच्या सीमेवर जनार्दन पेवेकर यांचे घर आहे. शनिवारी दुपारी आलेल्या धुवाँधार पावसामुळे शॉर्टसर्कीट होऊन त्यांच्या घराला आग लागली. यावेळी कर्देकर कुटुंबिय कामानिमित्त घराबाहेर गेले असल्यामुळे जीवित हानी टळली. घराला आग लागल्याचे कळताच शेजाऱ्यानी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. दापोली नगर पंचायतीकडे बंब नसल्याने खेड नगर परिषदेला कळवण्यात आले. मात्र त्यांचा बंब येईपर्यंत घर आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. यामुळे पेवेकर यांचा संसार उघड्यावर पडला आहे.