गुहागर : मुसळधार पावसामुळे गुहागर तालुक्यातील मौजे पांगारीतर्फे वेळंब येथील सुवर्णा शांताराम खांबे यांचे राहते घर पूर्णत: कोसळले आहे. यामध्ये 60 ते 62 वर्षीय सुवर्णा शांताराम खांबे यांना किरकोळ दुखापत झाली. ही घटना शनिवारी मध्यरात्री दीड वाजता घडली.
तालुक्यातील पांगारीतर्फे वेळंब येथील सुवर्णा शांताराम खांबे यांचे जुने मापाचे घर आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना शनिवारी मध्यरात्री दीड वाजता त्यांच्या खाटेकडील भिंत अचानक कोसळली. ही भिंत सुदैवाने त्यांच्यावर न कोसळता बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला, मात्र भिंत कोसळताच घराचे वासेही खाली आले. हे घर वाडीमध्येच असल्याने आजूबाजूच्या घरातील सर्व मंडळी जागी झाली. त्यांनी तातडीने सुवर्णा खांबे यांना बाहेर काढले. या घटनेची खबर येथील तलाठी प्राची घाणेकर यांना मिळताच त्यांनी या घटनास्थळी भेट दिली. कोसळलेल्या घराचा पंचनामा करून सुमारे 1 लाख रुपये नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सुवर्णा खांबे यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.